सांगली, प्रतिनिधी : गोमातेला योग्य राष्ट्रीय सन्मान मिळावा, संपूर्ण देशात गोवंशाचे संरक्षण व्हावे आणि गोसेवेसाठी प्रभावी केंद्रीय धोरण व कायदेशीर व्यवस्था निर्माण व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी देशभर सुरू असलेल्या ‘गोसम्मान आह्वान अभियान’ अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेचा दुसरा टप्पा आज सांगली जिल्ह्यात पार पडला.
या निमित्ताने गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घटनात्मक/राष्ट्रीय मान्यता मिळावी, संपूर्ण देशासाठी गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कायदा करण्यात यावा व त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी तसेच गोमातेसाठी स्वतंत्र ‘गो मंत्रालय’ स्थापन करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना देण्यात आले. यासोबत या मागण्यांना समर्थन देणाऱ्या नागरिकांचे हस्ताक्षर पत्रकही सादर करण्यात आले.
देशभरातील संत-महंतांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या अभियानाला देशातील गोभक्त, गोसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातून ५ कोटींहून अधिक स्वाक्षरी संकलित करण्यात आल्या असून, त्याची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाल्याचा अभियानाच्या आयोजकांचा दावा आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते.
आता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशभरातून १५ कोटी स्वाक्षरी संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ लाख स्वाक्षरी संकलित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या पुढील टप्प्यात आज देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एकाच दिवशी निवेदन सादर करण्यात येत असून, ही व्यापक जनआंदोलनात्मक कृतीही जागतिक विक्रमाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.
अभियानाच्या प्रमुख मागण्या
१. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून राष्ट्रीय सन्मान व मान्यता द्यावी.
२. संपूर्ण भारतासाठी गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कायदा करावा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
३. गोवंश तस्करी व गोहत्येला आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक तरतुदी करण्यात याव्यात.
४. गोमातेसाठी स्वतंत्र ‘गो मंत्रालय’ स्थापन करावे.
५. गोशाळा, गोसंवर्धन, गोआधारित नैसर्गिक शेती व पंचगव्य संशोधनाला प्रभावी शासकीय पाठबळ द्यावे.
६. गोवंशाच्या संरक्षणासाठी देशव्यापी ठोस धोरण व प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करावी.
7.
गोसंवर्धन हा केवळ धार्मिक किंवा भावनिक विषय नसून कृषी, पर्यावरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, नैसर्गिक शेती आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित राष्ट्रीय विषय आहे, त्यामुळे केंद्र शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक धोरणात्मक व कायदेशीर निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदन प्रसंगी नितेश ओझा, केदार मेहेंदळे, विश्वनाथ कानिटकर, अंकुश गोडसे, सिद्धेश्वर चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, विवेक जितकर, डॉ. प्रल्हाद कुलकर्णी, अनघा कानिटकर, गौरी जोशी, शर्वरी कुलकर्णी, मंदार मेहेंदळे,प्रवीण पाटील, शेखर परीट यांच्यासह अनेक गोसेवक, गोभक्त व नागरिक उपस्थित होते.
“गोमातेचा सन्मान, गोवंशाचे संरक्षण आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन यासाठी देशव्यापी जनमत निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. केंद्र शासनाने जनभावनेचा विचार करून गोमातेला योग्य राष्ट्रीय सन्मान देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
— गोसम्मान आह्वान अभियान.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या