पलूस, दि. २७ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनसेवा सप्ताहा अंतर्गत आयोजित युवा संकल्प शिबिर पलूस येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. युवकांमध्ये सकारात्मक विचार, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा संकल्प रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम म्हणाले की, "युवकांनी आपल्या आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आजच निर्णय घेऊन कृतीला सुरुवात करावी. संकल्प केवळ शब्दांत न राहता तो कृतीत उतरला पाहिजे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सर्वाधिक विश्वास युवा पिढीवर होता. सक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार युवा पिढी घडली तरच सक्षम राष्ट्र उभे राहू शकते. त्यामुळे प्रत्येक युवक-युवतीने समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून विकासाच्या प्रवाहात सक्रिय सहभाग नोंदवावा," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रवक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विशाल माने यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "यशस्वी होण्यासाठी युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मात्र स्वप्न पाहणे पुरेसे नसून ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. एका दिवसात कोणालाही यश मिळत नाही. त्यासाठी योग्य नियोजन, स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य दिशेने वाटचाल आवश्यक असते. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मांडलेला विकासाचा विचार प्रत्येक युवकाने पुढे नेण्याची गरज आहे. स्वतःचा विकास करताना राज्य आणि देशाच्या प्रगतीलाही हातभार लावणे हीच खरी युवा शक्ती आहे," असे त्यांनी सांगितले.
ग्लोबल व्यासपीठ, कराडचे सूर्यकांत पानसकर यांनीही युवकांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रात सक्रिय राहून नेतृत्व विकसित करण्याचे आवाहन केले. बदलत्या काळात युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून समाजहिताचे कार्य करावे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पुदाले, अध्यक्ष, पलूस शिक्षण प्रसारक मंडळ होते. त्यांनी युवकांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाण आणि राष्ट्रीय मूल्ये जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी स्व. अजितदादा पवार क्रीडा सन्मान पुरस्कार विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे : श्रेयश राजाराम साळुंखे (पलूस), कु. अथर्व कुमार मोरे (गोंदिलवाडी), पै. रिया अजित भोसले (पलूस), कु. अथर्व सतीश मिरजकर (अंकलखोप), अविनाश लाड (कुंडल), मिस्त्री अनिस असलम शिकलगार (अंकलखोप), पै. प्रेरणा सयाजी पाटील (देवराष्ट्रे) आणि पंकज पोपट जाधव (बुरुंगवाडी). पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गौरव केला.
कार्यक्रमास
पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य साळुंखे, प्राचार्य विजयकुमार गायकवाड, यांच्यासह अनिल पाटील, रणजीत शिंदे, राहुल पाटील, तोफिक मुल्ला, सागर कदम, भास्कर संकपाळ, दौलतराव पाटील, सचिन कुराडे, आशिष सूर्यवंशी, हरीश वडार, कृष्णा मिठारी, अभिजीत कौलगे, तुषार सूर्यवंशी, विकी तातूगडे, अभिजीत कदम, अंकुश राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संजय शिंदे यांनी केले. अंकुश राजमाने यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर राहुल पाटील यांनी आभार मानले.
युवा संकल्प शिबिरातून युवकांना प्रेरणा, दिशा आणि समाजाभिमुख कार्याचा संदेश देण्यात आला. विकास, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प युवकांनी यावेळी व्यक्त केल्याने हा कार्यक्रम जनसेवा सप्ताहातील एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या