प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळा' बेळंकी (ता. मिरज) येथे उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण परिसरात या निमित्ताने आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा मा. आ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे तसेच कार्यक्रमाच्या सांगली शहर जिल्हा प्रभारी सौ. मंजिरीताई गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा महिला मोर्चा पश्चिम मंडळाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि यशस्वी ठरला.
कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आधुनिक, शाश्वत व नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. विजय वरुडकर तसेच रवींद्र कुलकर्णी (ग्रामविकास व नैसर्गिक शेती तज्ज्ञ) यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, मातीचे आरोग्य, सेंद्रिय शेतीतील संधी, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित महिला शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी सखोल उत्तरे देत शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, परिसरातील महिला शेतकरी, भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत महिला सक्षमीकरण आणि कृषी जनजागृतीचा संदेश देणारा ठरला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास आणि शेतीविषयी नवी दिशा निर्माण झाल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या