‘आयुष्याचे पुस्तक माझ्या’ या नावाचा प्रकाश वायदंडे यांचा नवीन काव्यसंग्रह नुकताच न्यू अथर्व पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण एकोणऐंशी कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रकाश वायदंडे सर साधारणपणे पस्तीस वर्षांहून अधिक काळ काव्यलेखन करत आहेत. ‘ भारतवर्षा तुझ्याचसाठी ’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्याला काव्यरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्यानंतर बऱ्याच प्रतिक्षेनंतर त्यांचा ‘आयुष्याचे पुस्तक माझ्या’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. आजच्या समकालीन कवितेच्या क्षेत्रात आशयगर्भ कविता लिहिणाऱ्या कवीमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आजच्या समकाळातील सामाजिक वास्तव, प्रश्न, समस्या यांना कवितेच्या माध्यमातून भिडण्याचे धैर्य त्यांच्या कवितेत आहे. समकाळातील प्रश्न उजागर करण्याचे प्रामाणिक काम कवी प्रकाश वायदंडे यांनी केले आहे. कारण त्यांना समकाळाचे भान असल्याने त्यांच्या कविता बहुआयामी स्वरूपाची असल्याचे दिसून येतात. त्यांनी आपला सगळा भवताल आपल्या कवेत सामावून घेतला आहे असे दिसून येते. म्हणून त्यांच्या कवितांना सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.
‘आयुष्याचे पुस्तक माझ्या’ या संग्रहातील काही कविता आत्मपर तर काही बहुविध प्रश्नांचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. त्यामधून कवीच्या संवेदनशील वृत्तीचे दर्शन घडते. त्यांची कविता केवळ स्वांतसुखाय प्रवृत्तीची नाही. तर ती ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या प्रवृत्तीच्या आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता समाजाभिमुख आहेत. कवीला सामाजिक भान आणि अवधान असावे लागते तरच त्या कवीच्या कविता समाजाचे भीषण वास्तव निर्भीडपणे मांडू शकतात. प्रकाश वायदंडे यांच्या कविता समाजाला नवा प्रकाश दाखविणाऱ्या आहेत. त्या कविता समाजाला दिशादर्शक आहेत. कवीच्या मनातील ध्येयवाद ते काही कवितांच्या मधून प्रकट करतात. कोणत्याही श्रेष्ठ कवितेचा जन्म वेदनेतून होत असतो असे म्हटले जाते. त्यास प्रकाश वायदंडे यांची कविता अपवाद नाही. त्यांनी आपल्या मनातील दु:ख, वेदना कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रकट केले आहे. पण त्यांच्या दु:खाच्या, वेदनेच्या नाना तऱ्हा आहेत. व्यक्तिगत दु:ख तर आहेच पण सामाजिक दु:खाने, वेदनेने ते व्यथित होतात याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून प्रकट झाले आहे. सामाजिक विषमतेमुळे त्यांच्या वाट्याला आलेल्या दु:खाने त्यांचे मन पोळले आहे. त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली त्यामुळे ते अनेकदा अस्वस्थ होतात. एवढेच नव्हे तर निसर्गाचा समतोल ढळला असल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला दु:ख येत आहे. लहरी निसर्ग त्यास कारणीभूत आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसाने अन सततच्या दुष्काळाने बळी राजा नेहमीच त्रस्त आहे. कवी संवेदनशील वृत्तीचे असल्याने शेतकऱ्यांच्या दु:खाने त्यांचे मन व्यथित होते. त्याची वेदना त्यांच्या मनाला छळत आहे असे त्यांच्या कविता वाचल्यानंतर लक्षात येते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून पाहण्यास मिळाले आहे. वर्तमानात जगाला अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे साऱ्या जगाला अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला त्यांची कविता बिनधास्त भिडत आहे. हेच त्यांच्या कवितेचे घवघवीत यश आहे असेच म्हणावे वाटते. त्यामुळे प्रकाश वायदंडे यांची कविता केवळ आत्मपरतेपुरती मर्यादित नसून, त्या कवितेचा पट वैश्विक पातळीपर्यंत पोहचला आहे.
प्रकाश वायदंडे यांनी त्यांच्या कवितेला चिंतनाची जोड दिलेली आहे. त्यात ध्येयवाद आहे. शेतकऱ्यांचे दु:ख दूर व्हावे. त्यांच्या वाट्याला आनंद यावा असे त्यांना मनापासून वाटते. आपल्या मनातील ध्येयवाद कवितेतून प्रकट करताना ‘अजूनही मी थकलो नाही’ या कवितेत कवी म्हणतात की,
अजूनही मी थकलो नाही
खूप चालणे बाकी आहे
डोळ्यांपुढती ध्येय आहे
सफर अजूनही बाकी आहे.
ही कविता आत्मनिष्ठ स्वरूपाची असली तरी या कवितेमधून कवीचा ध्येयवाद प्रकट होत आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी कवीला अजून खूप कष्ट घ्यायचे आहेत. यश मिळविण्यासाठी अजून खूप लढण्याची जिद्द कवीच्या मनात आहे. परंतु कवीच्या मनातील आशावाद तसूभरसुद्धा कमी होत नाही. आपले ईप्सित गाठण्यासाठी मात्र कवीला पुस्तकांचा आधार महत्वाचा वाटतो. म्हणून कवी म्हणतात की,
पुस्तकांच्या पानोपानी
आशावादाचा आहे ठेवा
उमेदीने जगण्याचाही
सांडला आहे त्यात मेवा
यामधून कवीने आपला आशावाद सोडला नाही. कवीने आपली उमेद न हरता, मनात आशावाद जीवंत ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या तत्त्वांचा अंगीकार कवीने केला आहे म्हणूनच त्यांच्या कवितेत शिकण्याचे, पुस्तकांच्या सहवासाचे चित्रण आलेले आहे. एका अर्थाने कवीच्या व्यक्तिमत्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ठसा उमटला आहे असे म्हणावे वाटते. त्यामधूनच कवीच्या मनात ध्येयवाद निर्माण झाला असावा.
भारतीय समाजातील वास्तव अत्यंत भीषण आहे. समाजात असमानता पाहण्यास मिळते. या असमानतेचे मूळ येथील चातुर्वर्ण्य व्यवस्थेत दडले आहे. त्यामुळेच समाजातील लोकांना विषमतेचे जिणे जगावे लागत आहे. उपेक्षित समाजातील काही लोकांना पोटभर दोन वेळचे अन्न मिळत नाही याची खंत कवीला आहे. त्यामुळे कवीचे मन विषण्ण होते याबाबत ते म्हणतात की,
रोज रोज भाकरीचा चंद्र हवा होता
सभोवती अंधार सारा दिवा दूर होता
सामान्य माणूस दररोजच्या दोन वेळच्या अन्नाला महाग होत आहे कारण त्यांच्या वाट्याला दुःख,दैन्य, दारिद्र्य आले आहे. त्यातूनच समाजात मोठ्या प्रमाणात विषमता पाहण्यास मिळत आहे. ही विषमता वर्णव्यवस्थेतून निर्माण झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसांना दोन वेळची भाकरी मिळत नाही. हे भीषण वास्तव समाजात पाहण्यास मिळत आहे. त्यात काही केल्या बदल झाला आहे असे दिसत नाही. प्रकाश वायदंडे यांच्या पूर्वी ज्येष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत नारायण सुर्वे म्हणतात की,
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली
याचाच अर्थ असा सांगता येतो की, उपेक्षित, वंचित समाजात दु:ख, दैन्य, दारिद्र्य आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे जिणे हराम झाले आहे. त्यांना सुखाने दोन घाससुद्धा मिळत नाहीत. हे भीषण वास्तव आजच्या समाजातही पाहण्यास मिळते. याची खंत जशी कविवर्य नारायण सुर्वे वाटत होती तशी खंत प्रकाश वायदंडे यांनाही आहे. म्हणूनच या दोन कवींनी भाकरीचा चंद्र म्हणजे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या वंचित, उपेक्षित लोकांचे गाऱ्हाणे कवितेच्या माध्यमातून मांडले आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या विचारांचा वारसा प्रकाश वायदंडे यांच्यासह अनेक कवींनी पुढे चालू ठेवला आहे.
भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात जातीयता पाहण्यास मिळत आहे
याचेही दु:ख कवीला आहे. या देशात जाती व्यवस्था श्रेष्ठ मानणारी पुरातनवादी विचारसरणी रूढ आहे. पण या देशात माणुसकी महत्त्वाची असली पाहिजे असे आपल्याकडील विचारवंतांना वाटते आणि ते योग्यच आहे. यासंबंधी कवीने ‘अस्वस्थतेच्या वळणावर’ या कवितेत माणुसकी श्रेष्ठ आहे. या विचारांचा जागर केला आहे. या देशात परस्परांवर प्रेम करणाऱ्या दोन भिन्न भिन्न जातीच्या तरुण तरुणीना त्यांच्या जातीवरून अन्याय केला जातो. त्यांच्या प्रेमाला सनातनी लोकांचा विरोध आहे. या देशात माणसांपेक्षा त्याची जात महत्त्वाची वाटते. हे सामाजिक वास्तव भीषण असल्याने कवींचे मन विषण्ण होते.
माणसांच्या जीवनात अनादी काळापासून दु;ख, वेदना आहेत. या दु:ख, वेदना काही वेळा वैयक्तिक स्वरूपाच्या असतात तर काही वेळा या वेदना सामाजिक परिस्थितीतून प्राप्त झालेल्या असतात. या काव्यसंग्रहात कवीच्या वाट्याला आलेल्या वेदना ह्या सामाजिक विषमतेतून आलेल्या आहेत. म्हणूनच कवी वेदनेसंदर्भात म्हणतात की,
वेदना ही चिकटून येते
आदि अंतापावेतो
दु:ख मुक्तीसाठी तुजला
देव कुठे तो पावतो
माणसांच्या वाट्याला आलेली वेदना ही सामाजिक विषमतेतून आलेली आहे. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत माणसांच्या वेदना कोणीही संपवू शकत नाही अगदी देवसुद्धा माणसांच्या वाट्याला आलेल्या वेदना किंवा दु:ख यापासून माणसाला मुक्ती देऊ शकत नाही. संत साहित्यात संत चोखा मेळा या अस्पृश्य समाजातील कवीला सुद्धा पुरातनवादी विचारसरणीच्या अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. संत चोखा मेळा पांडुरंगांचा अव्वल भक्त होता. पण त्याच्याही वाट्याला दु:ख, वेदना, अवहेलना आल्या आहेत. प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा संत चोखा मेळा यांची यांची दु:खातून सुटका करू शकले नाहीत हे वास्तव आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. हे सामाजिक वास्तव कवी प्रकाश वायदंडे यांच्या प्रमाणे लाखों लोकांच्या वाट्याला आलेले आहे. ही सामाजिक व्यवस्था बदलली तरच माणसांच्या वाट्याला आलेली वेदना आणि दु:ख यापासून माणसांची मुक्तता होणार आहे. म्हणून ‘आमुचा भीम’ या कवितेत कवी म्हणतात की,
समानतेचे विचार घेऊन वंचिताकडे जाऊ
विस्थापितांच्या व्यथा वेदना जाणूनही घेऊ
वंचित, उपेक्षित समाजाच्या व्यथा आणि वेदना समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर निश्चितपणे समतेच्या विचारांकडे गेले पाहिजे. आपल्या भारतात महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार प्रभावीपणे मांडला आहे. या विचारानेच माणसांना समता प्राप्त होऊ शकेल आणि त्यांची सर्व प्रकारच्या दु:ख, वेदना यातून मुक्तता होऊ शकेल असा आशावाद कवीला आहे. म्हणूनच कवीने ‘वाच पोरा वाच थोडे’ या कवितेत आंबेडकरी विचारांच्या जाणिवा प्रकट केल्या आहेत. आंबेडकरी विचारात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन करताना म्हटले होते की, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचारातील शिक्षणाचे महत्त्व प्रकाश वायदंडे यांनी ओळखले आहे. म्हणून ते ‘वाच पोरा वाच थोडे’ या कवितेत म्हणतात की,
म्हणून सांगे बाप तुझा वाच पोरा वाच
वाचनानेच लागेल तुला जाणिवेची आच
प्रकाश वायदंडे यांची कविता शेतकऱ्यांच्या आक्रोशाला साद घालणारी आहे. साऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळी राजाला आजच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून प्रकट केले आहे. कायम स्वरूप पडणारा दुष्काळ, तसेच अवकाळी पडणारा पाऊस, शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नसणारा हमीभाव यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याचे दु:ख कवीला आहे म्हणून ते ‘शेतकरी बाप’ या कवितेत म्हणतात की,
काळ्या मातीमध्ये खपे माझा बाप
नियतीने त्याला दिला मोठा शाप
शेतांमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या अनेक व्यथा आणि अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना सरकार न्याय देऊ शकत नाही. जगाला पोसणाऱ्या बळी राजाच्या वेदना कवीने अनेक कवितेतून प्रभावीपणे मांडल्या आहेत. प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे दु:ख, व्यथा, वेदना त्यांच्या ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडचे धनी’ या सारख्या कविता संग्रहांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. त्यात शेतात कष्टत असणाऱ्या बापाचे चित्रण करताना इंद्रजीत भालेराव म्हणतात की,
झाडा झाडाला विचारा
आत्महत्येच्या कहाण्या
या पहाडाला विचारा
माझ्या बापाच्या विराण्या
इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेत दुष्काळाने होरपळलेल्या बळी राजाला कोणताच दिलासा मिळत नाही. त्यामुळे त्याचे जीवन असहाय्य झाले आहे म्हणूनच काही लोकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. हे वास्तव आज मराठवाड्यात अनुभवायला येत आहे. प्रकाश वायदंडे यांची कविता इंद्रजीत भालेराव यांच्या जातकुळीतली आहे असे वाटते. दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे भावविश्व प्रभावीपणे मांडताना प्रकाश वायदंडे आपल्या ‘बळीराजाची व्यथा’ या कवितेत म्हणतात की,
रान मातीच्या कुशीत
किती पेटलाय जाळ
पाण्याअभावी हा आला
आता कोरडा दुष्काळ
सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाते. वर्षभर काय खायचे याची त्याला भ्रांत पडते त्याचे विदारक चित्र कवीने या कवितेत प्रभावीपणे मांडले आहे.
प्रकाश वायदंडे यांनी आपल्या कवितेतून पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला आहे. माणसांने निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. ते परस्परास पूरक आहे असे असताना माणूस स्वार्थीपणाने अनेक ठिकाणचे जंगल नष्ट करत सुटला आहे. माणसांच्या अप्पलपोटीपणाने जंगलांचा पर्यायाने पर्यावरणाचा नाश होत आहे. यामुळे कवीला दु:ख होत आहे. आपल्या ‘झाड नि झाड तुटते तेव्हा’ या कवितेत ते म्हणतात की,
झाड नि झाड तुटते तेव्हा
नष्ट होते आख्खे जंगल
माणसांच्या या कृतीतून
काय घडेल अवघे मंगल
माणसाने झाडे तोडल्यावर माणसांचे काय भले होणार आहे. माणसांचे काय मंगल होणार आहे हा प्रश्न विचारला आहे. विकासाच्या नावावर माणूस डोंगर पोखरून फार्महाऊस बांधत आहे. हे चिंताजनक आहे असे कवीला वाटते. प्राण्यांचा आधिवास माणसांनी बळकावला आहे. हे एक प्रकारचे माणसांचे निसर्गावर अतिक्रमण आहे. त्यामुळे काही हिंस्र प्राणी मानवी वस्तीत दिसू लागले आहेत. यासंबंधी कवी म्हणतात की,
झाले उदंड बिबटे
जंगल कुठे ते उरले
हे वन्यजीव आमच्या
वस्तीत का रे शिरले ?
पर्यावरणाचा एक मोठा गंभीर प्रश्न आज साऱ्या जगाला भेडसावत आहे. माणसाने पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. परंतु त्याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. हे कवीने या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे.
प्रकाश वायदंडे यांची कविता सुगम आहे. ती क्लिष्टतेत अडकत नाही. त्यांना जे म्हणायचे आहे ते थेटपणे कवितेच्या माध्यमातून मांडत आहेत. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमा या साध्या आहेत. उदाहरणार्थ भाकरीचा चंद्र, आठवणीचा पर्जन्य, इत्यादी. त्यांच्या कवितेतला आशय थेटपणे वाचकांच्या मनाला भिडावा असा आहे. त्यांच्या काही कवितेला गेयतेची देणगी लाभलेली आहे. त्यांच्या कवितेच्या जाणिवा विस्तारल्या असून त्यांच्या कविता आशयसमृद्ध झाल्या आहेत. या कवितांच्या माध्यमातून मानव्याची प्रतिष्ठा वाढावी आणि माणसांची सर्व प्रकारच्या जोखडातून सुटका व्हावी असा आशावाद या कवितेतून व्यक्त झाला आहे. प्रकाश वायदंडे यांच्या या कवितांचे रसिक वाचक भरभरून स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
डॉ. शशिकांत खिलारे
सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या