सांगली, प्रतिनिधी : सांगली येथील चिंतामण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या १४ वर्षांखालील मान्सून क्रिकेट लीग स्पर्धेत पोलाईट क्रिकेट क्लब भिलवडी–पलूस संघाने उत्कृष्ट सर्वांगीण खेळाचे प्रदर्शन करत सुमित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब, सांगलीचा पराभव करून मान्सून क्रिकेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुमित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब, सांगली संघाने ४० षटकांत १४० धावा उभारल्या. पोलाईट क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. विशेषतः दीप जाधव याने भेदक गोलंदाजी करत तब्बल ८ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले.
१४१ धावांच्या विजयलक्ष्याचा पाठलाग करताना पोलाईट क्रिकेट क्लब भिलवडी–पलूसच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळाचा उत्कृष्ट मिलाफ साधला. संघाने अवघ्या २८ षटकांत ५ गडी गमावून विजय संपादन केला. फलंदाजीत इशित शिंदे याने शानदार ५५ धावा, दिग्विजय पाटील याने ३३ धावा, तर आकाश समंता याने २७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
संपूर्ण सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप जाधव याला 'सामनावीर' पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा. संजय बजाज यांनी विजेत्या संघाचे विशेष कौतुक करून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सागर पेंडूरकर, निलेश शहा तसेच पोलाईट क्रिकेट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.
पोलाईट क्रिकेट क्लब भिलवडी–पलूसचा संघ बीसीसीआय लेव्हल-१ क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी व पलूस येथे नियमित आणि कसून सराव करत असून, त्याचेच फलित या विजेतेपदाच्या रूपाने पाहायला मिळाले. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या