प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगर परिषदेत पाणी पुरवठा,बांधकाम,शिक्षण, आरोग्यसह विविध विभागांच्या कामांचा आमदार रोहित पाटील यांनी सखोल आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.नागरिकांच्या वाढत्या तक्रारी, रखडलेली विकासकामे आणि कामातील दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत जाब विचारत,जनतेच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या व प्रलंबित कामांचा तपशील घेण्यात आला.नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत कामे वेळेत का पूर्ण होत नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले.यावेळी आमदार रोहित पाटील यांनी, "जनतेला दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.कामात दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, lअन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल," असा स्पष्ट इशारा दिला.बैठकीत पाणीपुरवठा व्यवस्था,शहरातील रस्ते,स्वच्छता, आरोग्य सेवा,शिक्षण विभागातील प्रलंबित कामे तसेच इतर नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना आमदारांनी दिल्या.तसेच, नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत,त्यांच्या समस्या वेळेत सोडवून प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करावा,असे निर्देशही त्यांनी दिले.या बैठकीमुळे नगर परिषदेतील प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून,प्रशासनावर अधिक जबाबदारीने काम करण्याचा दबाव निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या