प्रतिष्ठा न्यूज /अक्षय कोठावळे
हातकणंगले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहा अंतर्गत हातकणंगले येथे शासकीय दाखला शिबिर, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन तसेच अंगणवाडीतील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे लोकोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडले. समाजसेवेतून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जनतेच्या प्रश्नांना तत्परतेने न्याय देणारे, विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि "कामाचा माणूस" म्हणून सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर यंदाची त्यांची पहिली जयंती सेवा कार्यातून साजरी करण्यात आली. वाढदिवसाचा उत्सव न साजरा करता जनहिताचे उपक्रम राबवून त्यांना आदरांजली वाहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
हातकणंगले येथील मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, सेतू विभाग, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना आदी विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच आवश्यक कागदपत्रे स्वीकारून विविध दाखल्यांच्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील (असुर्लेकर) यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष श्री. अनिलदादा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष श्री. यासीन मुजावर, नगराध्यक्ष श्री. अजितसिंह पाटील (काका), उपनगराध्यक्षा सौ. रोहिणी खोत, नगरसेविका सौ. सुप्रिया इंगवले, सौ. सुजाता कारंडे, सौ. धनश्री चौगुले, सौ. निशा कांबळे, नगरसेवक श्री. महेश पाटील, श्री. रोहित निगवे, श्री. अमर वरुटे, श्री. सचिन बोराडे, युवा नेते श्री. हर्षवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री. संभाजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर हातकणंगले येथील अंगणवाडी क्रमांक ७६, ७७ व ७८ मधील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हातकणंगलेतील पहिल्या डिजिटल अंगणवाडी उपक्रमाची माहिती देण्यात आली. आधुनिक शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या अंगणवाडीत परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास बालक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार श्री. सुशीलकुमार बेल्हेकर, मंडळ अधिकारी श्री. अरुण पुजारी, मुख्याधिकारी श्री. विशाल पाटील, तलाठी श्री. मिलिंद चव्हाण, महसूल विभागाचे श्री. शैलेश जाधव, श्री. रोहन वडर, सौ. लतिका आरवाडे, सेतू विभागाचे श्री. नेमीनाथ चौगुले, श्री. जितेंद्र देसाई, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे श्री. प्रज्योत मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध विभागांच्या समन्वयामुळे नागरिकांना अनेक शासकीय सेवा एकाच ठिकाणी, सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे शक्य झाले.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हातकणंगले शहराध्यक्ष श्री. अमित खोत, श्री. दीपक कुण्णूरे, श्री. अनिस मुजावर, श्री. पलाश स्वामी, श्री. इम्रान चौधरी, श्री. रामदास पांडव, श्री. बाबासो ठोंबरे, सौ. स्नेहल शंभूराजे मोरे, सौ. मनीषा दबडे, श्री. मिलिंद चौगुले, श्री. अरुण परीट आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
"समाजसेवा हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी आदरांजली" या भावनेतून राबविण्यात आलेल्या या जनसेवा सप्ताहातील उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या