मिरज (1 जुलै): उत्साह, जल्लोष आणि विद्यार्थ्यांच्या बहारदार कलाविष्काराने केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा सतरावा वर्धापन दिन सोहळा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संकुल समन्वयक डॉ. सतिश पाटील व प्राचार्य डॉ. प्रताप भोसले उपस्थित होते.
दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगतदार नृत्ये, समूहगीत, आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट मिळत होता.
यावेळी बोलताना डॉ. प्रताप भोसले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व सांगून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शाळेच्या संस्थापिका स्व. संयोगिता पाटील वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली शाळा ही आता वटवृक्षाच्या रूपात आली आहे. यावेळी वहीनींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
डॉ. सतिश पाटील यांनी सादरीकरणात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हार्डी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पाटील यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या