पलूस, दि. २५ : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे विविध उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (अप्पा) कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या दिवशी आमनापूर, अंकलखोप व बोरजाईनगर येथे आरोग्य शिबिर व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ईसीजीसह रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी तसेच नेत्रतपासणी करून मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
याच दिवशी आमनापूर ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या कर्जमाफी योजनेची पहिली यादी माननीय प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेबाबत मार्गदर्शन केले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आर्थिक अडचणींवर काही प्रमाणात मात करता येणार आहे.
कार्यक्रमावेळी कुलदीप वारे, अंकुश रस्ते, महेश हजारे, तुषार सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम कांबळे, विकी तातुगडे, अंकुश राजमाने, रणजीत शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे जनतेमध्ये आरोग्यजागृती वाढीस लागली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न होत असून आरोग्य, शिक्षण व शेतकरी कल्याणाच्या दिशेने उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील जनतेला थेट सेवा मिळत असल्याने जनसेवा सप्ताह अधिक परिणामकारक ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या