तासगाव : स्वराज्यरक्षक,स्वामीनिष्ठ देशभक्त वीर शिवा काशीद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त तासगाव येथील संत सेना मंदिरात अभिवादन व गुणवंत सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून शासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या तरुणांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ विजया बाबासाहेब पाटील,नगरसेविका भारती धाबुगडे,संध्या लुगडे,संत सेना सेवा संघाचे पदाधिकारी,जीवा शिवा सेना प्रतिष्ठानचे प्रतिनिधी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलात नियुक्ती झालेल्या तेजस्विनी ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या मयुरी ज्ञानदेव जाधव, प्रियांका हणमंत गायकवाड आणि तेजस्वी प्रकाश साळुंखे, तसेच भारतीय हवाई दलात (एअर फोर्स) निवड झालेल्या सार्थक सुनील गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर शिवा काशीद यांच्या स्वामीनिष्ठा,त्याग,शौर्य आणि बलिदानाचा इतिहास तरुण पिढीसमोर प्रेरणादायी असल्याचे सांगितले.राष्ट्रहितासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या वीर शिवा काशीद यांचा आदर्श प्रत्येक युवकाने अंगीकारावा, असे आवाहन करण्यात आले.तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या तरुणांनी प्रामाणिकपणे जनसेवा करत समाजाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.कार्यक्रमाचे आयोजन जीवा शिवा सेना प्रतिष्ठान आणि संत सेना सेवा संघ,तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.समारंभाला उपस्थितांनी वीर शिवा काशीद यांच्या कार्याला अभिवादन करत देशभक्ती,त्याग आणि समाजसेवेचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वराज्यरक्षकाला अभिवादन..राष्ट्ररक्षकांचा तासगावात गौरव!
By -
जुलै १४, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या