कोल्हापूर, दि. २७ : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील प्रसिद्ध ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी मंगळवारी (२८ जुलै) नांदणी येथील निशिधिका परिसरात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सर्वोच्च न्यायालय, राज्य शासन आणि उच्चाधिकार समितीने अनुकूल निर्णय दिल्यानंतरही माधुरीला अद्याप नांदणी मठात परत आणण्यात आलेले नसल्याने भाविक, जैन समाज आणि हत्तीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येत्या २८ जुलै रोजी माधुरीला गुजरातमधील वनतारा येथे हलवून एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या घरवापसीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आचार्य श्री शांतीसागर महाराज जयंती महोत्सवासाठी माधुरीला नांदणी मठात आणण्यात यावे, अशी जैन समाजाची आग्रही मागणी आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशभरातून हजारो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे या धार्मिक आणि भावनिक विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
माधुरी हत्तीच्या संगोपनाबाबत नांदणी मठात योग्य काळजी घेतली जात नसल्याची तक्रार प्राणीहक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेने केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार माधुरीला गुजरातमधील वनतारा येथे हलविण्यात आले. मात्र या निर्णयानंतर कोल्हापूर, सांगली तसेच सीमाभागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. स्थानिक नागरिक, जैन समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी माधुरीला पुन्हा मठात आणण्याची मागणी लावून धरली होती.
दरम्यान, वनताराकडूनही आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माधुरीला नांदणी मठात परत पाठविण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि संबंधित उच्चाधिकार समितीनेही घरवापसीसाठी आवश्यक परवानगी दिली. मात्र अंतिम टप्प्यात तज्ज्ञ समितीची स्थळ पाहणी आणि अहवाल सादर करण्याची प्रक्रिया रखडल्याने संपूर्ण विषय प्रलंबित राहिला आहे.
याच मुद्द्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तज्ज्ञ समितीकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून माधुरीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा हा प्रश्न अधिक तीव्र आंदोलनाच्या स्वरूपात उभा राहू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
माधुरी ही केवळ एक हत्ती नसून नांदणी मठाशी आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेले भावनिक प्रतीक आहे. त्यामुळे तिच्या घरवापसीच्या मागणीला सामाजिक, धार्मिक आणि जनभावनेचा मोठा आधार मिळत आहे. सांगली, कोल्हापूर तसेच उत्तर कर्नाटकातील भाविकांकडूनही प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन माधुरीला नांदणी मठात परत आणावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
मंगळवारी होणाऱ्या राजू शेट्टी यांच्या लाक्षणिक उपोषणाकडे आता राज्यभरातील जैन समाज, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, या आंदोलनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या