प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेनिमित्त नटराज पूजन आणि गुरुंचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवार दि.२६ रोजी संस्कार भारती सांगली जिल्हा समिती तर्फे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात आस्था ओगले हिने गायलेल्या संस्कार भारती ध्येय गीताने झाली.प्रमुख पाहुणे श्री.दीपक तथा नाना महाराज केळकर यांच्या हस्ते नटराज पूजन झाल्यानंतर सांगली समिती अध्यक्ष श्री.मिलिंद महाबळ यांनी प्रास्ताविकात संस्थेविषयी माहिती सांगून सर्वांचे स्वागत केले.संस्कार भारतीचे सांगली जिल्हा संयोजक श्री.विसुभाऊ कुलकर्णी यांनी
श्री.नाना महाराज केळकर यांचा परिचय करून दिला.श्री.नाना महाराज केळकर यांचा सत्कार समिती अध्यक्ष श्री.मिलिंद महाबळ यांनी तर सौ.प्रज्ञाताई केळकर यांचा सत्कार समिती सचिव सौ.कविता कुलकर्णी यांनी केला.
या समारंभात विविध कलाक्षेत्रातली गुरुंचा सत्कार श्री.नाना महाराज केळकर यांचे हस्ते करण्यात आला.नृत्य कलेतील गुरु सौ.कल्याणी मुकुंद पटवर्धन,नाट्य कलेतील श्री.विवेक देशपांडे, शिल्प कलेतील श्री.विश्वेश म्हैसकर आणि साहित्य क्षेत्रातील गुरु श्री.दयासागर बन्नै यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.श्री.विवेक देशपांडे यांनी सत्कार मूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त करुन संस्कार भारतीचे आभार मानले.यावेळी 'रंगकर्मी ' हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.मुकुंद पटवर्धन यांचाही विशेष सत्कार
नाना महाराजांच्या हस्ते करण्यात आला .
आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे श्री.नाना महाराज केळकर
म्हणाले,"आई हा पहिला गुरु. आईसह अनेक गुरु आपल्याला लाभत असतात.गुरु आणि सद्गुरू यामध्ये फरक आहे.गुरु ज्ञान डोक्यापर्यंत पोहोचवतो.सद्गुरु ज्ञान अंत:करणापर्यंत पोहोचवतो. माऊलीने म्हटल्याप्रमाणे ' या ह्रदयीचे त्या ह्रदयी ' या भावनेने आपल्याजवळील सर्व ज्ञानदान करुन गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात." गुरुजनांचे स्मरण करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल त्यांनी संस्कार भारतीचे कौतुक
केले. ए.आय.च्या जगात अशा परंपरा जतन करण्याचे महत्वही त्यांनी विषद केले.आयुष्य संपन्न करण्यासाठी प्रत्येकाने एका तरी कलेची उपासना करावी असे आवाहनही त्यांनी केले.शेवटी समिती सचिव सौ.कविता कुलकर्णी यांनी आभार मानले.श्री.सुहास पंडित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री.माधव वैशंपायन यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहिले.
गुरुजनांच्या सत्कारानंतर सौ.कल्याणी पटवर्धन यांच्या शिष्य वर्गाने ' ती ची रुपे ' हा कथ्थक नृत्याचा स्त्रीची विविध रुपे दाखवणारा बहारदार कार्यक्रम सादर केला.यामध्ये सुमेधा जोग,ईश्वरी हिरेमठ,तेजा गोरे,यशश्री मोरे आणि मुक्ता पटवर्धन यांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे आयोजन सौ.कल्याणी पटवर्धन यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.अश्विनी कुलकर्णी यांनी केले.या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.
संस्कार भारतीचे प्रांत प्रतिनिधी सह महामंत्री श्री.अमित मराठे, जिल्हा संयोजक श्री.विसुभाऊ कुलकर्णी, , पश्चिम प्रांत संगीत विधा संयोजक श्री.सुहास दिवेकर,
संतोष बापट, भालचंद्र चितळे, सुधीर सत्तीकर,
संजय जोशी, शैलेश करमरकर, नितीन कुलकर्णी,सुमेध कुलकर्णी, अरुण परचुरे, भालचंद्र लिमये,विश्वेश फडणीस,सौ.अंजली कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संस्थेचे सभासद, साहित्यिक, कलाकार व परिसरातील रसिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या