प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २७ :नवभारत शिक्षण मंडळाच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार विशालदादा पाटील यांनी शिक्षण संस्थांना जनरेशन-झेड पिढीशी जुळवून घेणे हे आजच्या काळात सोपे राहिलेले नाही, असे प्रतिपादन केले. तरीही नवभारत शिक्षण मंडळासारख्या संस्था आपला पाया घट्ट रोवून कार्यरत आहेत, याबद्दल अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात संचालक गौतमभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान भूषवताना खा. पाटील यांनी नुकत्याच जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे अनुभव कथन केले. शिक्षण संस्थांची आर्थिक बाजू सांभाळताना मूळ सिद्धांतांना बगल न देता संस्था अविरत सुरू ठेवणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थापक प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारांवर आजही संस्था कार्यरत असल्याचे समाधान व्यक्त करत सरोजताई पाटील (माई), माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे आवाहन केले.सभेत उपसंचालक बी. आर. थोरात, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह संस्थेतील दिवंगत पदाधिकारी व सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अभिनंदन ठरावांतर्गत कुरुंदवाडभूषण व समाजभूषण पुरस्कारप्राप्त रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील, ॲड. देवराज मगदूम, अभिजीत पाटील, माणिक मोरे व डॉ. मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेच्या चिकुर्डे शाखेतील माजी विद्यार्थी निलेश दिनकर पाटील यांनी दोन वेळा अंटार्टिका अभियानात सहभाग घेऊन देशसेवा केली असून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच आयर्नमॅन स्पर्धेचे विजेते अमर वसंत नायकवडी यांचा सन्मान करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक संचालक गौतम पाटील यांनी केले. अहवाल उपसंचालक डी. एस. माने यांनी सादर केला तर आर्थिक अंदाजपत्रक लेखापाल श्री. जमादार यांनी वाचले. आभार प्रदर्शन विश्वस्त ॲड. सतीश पाटील यांनी केले. या सभेला विश्वस्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, विनया घोरपडे वहिनी, कार्यकारिणी व सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या