सांगली | प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले असून, काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका तथा सभापती सौ. अंजली अजित जाधव यांनी हा विषय महासभेत चर्चेसाठी आणण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने स्वागत करत जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
महानगरपालिकेच्या सोमवार, २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या महासभेत अन्यायकारक वाढीव घरपट्टीबाबत विचारविनिमय व्हावा, यासाठी महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार सौ. अंजली जाधव यांनी पत्र दिले आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे व्यावसायिक, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध संस्थांमध्ये वाढीव घरपट्टीमुळे तीव्र नाराजी असल्याचे समितीने म्हटले आहे. या जनभावनांना सभागृहात वाचा फोडण्याचे काम सौ. जाधव यांनी केल्याबद्दल त्यांचे समितीने कौतुक केले.
दरम्यान, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत वाढीव घरपट्टीचे समर्थन केल्याचे सांगण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना कृती समितीने म्हटले आहे की, वाढीव घरपट्टीचे समर्थन करण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती, मालमत्ता मोजणीतील त्रुटी, भांडवली मूल्य निश्चितीतील विसंगती, कर आकारणीतील असमानता आणि सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक भार यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर कृती समितीने आमदार सुधीर गाडगीळ यांना जाहीर आणि खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. वाढीव घरपट्टीच्या समर्थनामागील कायदेशीर व प्रशासकीय कारणे नागरिकांसमोर स्पष्ट करावीत तसेच कृती समितीसोबत खुली चर्चा आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चर्चेची वेळ व ठिकाण आमदारांनी निश्चित करावे, समिती सर्व आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह चर्चेसाठी उपस्थित राहण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, वाढीव घरपट्टीविरोधातील पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता 'कष्टकऱ्यांची दौलत' येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि घरपट्टीमुळे त्रस्त नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आर्थिकदृष्ट्या वाढीव घरपट्टीचा फटका बसलेल्या सर्व नागरिकांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केले आहे.
या कृती समितीत सतीश साखळकर, हणमंतराव पवार, विष्णू दत्तात्रय बर्वे, रवींद्र वळवडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, शंभूराज काटकर, आनंद देसाई, नितीन मिरजकर, बाळासाहेब मासुळे, ओंकार माने, सुरेश टेंगले, सुभाष तोडकर आणि अजय यांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या