सांगली प्रतिनिधी : ज्ञानोबा माऊली..ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय पांडुरंग हरी अशा नामघोषामध्ये हजारो चिमुकल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
शांतिनिकेतन परिसरामध्ये यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यामध्ये नवभारत शिक्षण मंडळाच्या बालविकास मराठी माध्यम, बालविकास इंग्रजी माध्यम, शांतिनिकेतन विद्यामंदिर, शांतिनिकेतन कन्या शाळा , लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात अकॅडमी, डे बोर्डिंग अशा विविध शाखांचे हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले. विठ्ठल रखुमाईसह टाळकरी, विणेकरी, वासुदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषा साकारत विद्यार्थी व शिक्षकांनी जणू अवघे पंढरपूरच या ठिकाणी साकारले. मानाच्या पालखीसह विविध शाखांच्या पालख्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या . शांतिनिकेतन लोक विद्यापीठापासून साखर कारखाना ते मुख्य रस्त्यामार्गे आयोजित या दिंडीच्या दर्शनासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. दिंडी मार्गावर आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती. तर विद्यार्थी वारकऱ्यांसाठी पाणी व प्रसादाचे वाटपही ठिकठिकाणी करण्यात आले. दिंडी संपन्न झाल्यानंतर लोकविद्यापीठ परिसरातील मध्यवर्ती क्रीडांगणावर मानाच्या अश्वासोबत रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. अभंग, भजन, कीर्तनाचा गजर तर विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला पालकांनी धरलेल्या झिम्मा फुगडीचा फेर यामुळे वातावरण अधिकच उल्हसित झाले. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . समिता पाटील यांच्यासह
इनरव्हील क्लब ऑफ सांगली मिडटाउनच्या पदाधिकारी सुनिता दोशी, नंदा झाडबुके, प्रवीणा गोडबोले ,माधवी कोठारी, शुभदा भिलवडे, शारदा शहा , ममता काबरा आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली. संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास उपसंचालक डी.एस.माने उद्योजक सुनील मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन कदम, संजय बामणे, अनिकेत शिंदे यांनी या सोहळ्याचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या