प्रतिष्ठा न्यूज | तुकाराम पडवळ
गगनबावडा : महाराष्ट्र शासनाच्या 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियानांतर्गत गगनबावडा पोलीस ठाण्याच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. १३ जुलै रोजी गगनबावडा पोलीस ठाण्याच्या विस्तीर्ण परिसरासह साळवण कार्यक्षेत्रात एकूण ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, भविष्यात या वृक्षांच्या संगोपनावर प्रभावीपणे लक्ष ठेवता यावे यासाठी सर्व रोपांचे जिओ-टॅगिंग देखील करण्यात आले.
या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाने ५०० रोपे उपलब्ध करून दिली होती. यामध्ये आवळा, बेहडा, हिरडा यांसारख्या औषधी वनस्पतींसह सोनचाफा, चिंच आणि इतर स्थानिक छायादार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या प्रजातींची निवड करण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, "केवळ झाडे लावून न थांबता, त्यांचे मुलासारखे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृक्षसंवर्धनातूनच भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण मिळू शकते."
या मोहिमेत पोलीस ठाण्यातील सतीश पाटील, अशोक निकम, संदीप पाटील, दिगंबर पाटील, कृष्णा पाटील, अशोक पाटील, विलास गायकवाड, उज्ज्वला माने यांच्यासह एकूण १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच गगनबावडा तालुक्यातील सुमारे २० पोलीस पाटील, परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिक आणि डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी श्रमदान करून मोहिमेला मोठे बळ दिले.
वृक्षारोपणानंतर उपस्थित सर्वांसाठी सहाय्यक फौजदार सचिन गुरखे यांच्या वतीने चहापानाची व्यवस्था करण्यात आली. पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे गगनबावडा तालुक्यासह जिल्हाभरातून कौतुक होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या