प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : खाडे शैक्षणिक संकुलाच्या एनसीसी विभागाच्या वतीने तसेच १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सांगली यांच्या सहकार्याने एनसीसी कॅडेट्ससाठी रायफल फायरिंग प्रशिक्षणाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय सेवाभाव विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणास कॅडेट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना सुरक्षित शस्त्र हाताळणीचे नियम, रायफलची रचना व कार्यपद्धती, नेमबाजीची मूलभूत तत्त्वे, योग्य फायरिंग पोझिशन्स, लक्ष्यावर अचूक नेम साधण्याची तंत्रे तसेच फायरिंगदरम्यान पाळावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची सखोल माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी प्रत्यक्ष रायफल फायरिंगचा सराव करून प्रशिक्षणाचा अनुभव घेतला.
या प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, संयम, शिस्त, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली. तसेच राष्ट्रीय संरक्षण दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
प्रशिक्षणावेळी खाडे शैक्षणिक संकुलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका करुणा माने तसेच संगीता पाटील यांनी उपस्थित राहून कॅडेट्सना प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एनसीसीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही अशा उपयुक्त प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सदर प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय एनसीसी विभाग प्रमुख विक्रांत गौंड यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशिक्षक व एनसीसी विभागातील सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमात सहभागी सर्व कॅडेट्सनी अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या