सांगली, प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सिटी हायस्कूल, सांगलीच्या सन १९७५ च्या मॅट्रिक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविला. हरिपूर रोडवरील कृष्णामाईच्या पवित्र तीरावर वसलेल्या श्री महादाबा पाटील महाराज मंदिर परिसरात विविध फळझाडे आणि मोठ्या सावलीच्या वृक्षांसह एकूण २५ झाडांचे रोपण करण्यात आले.
या उपक्रमात ६७ ते ६८ वर्षे वयोगटातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सकाळचे आल्हाददायक वातावरण, मंदिर परिसरातील स्वच्छता आणि प्रसन्नता यामुळे वृक्षारोपणाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
यावेळी बोलताना उर्मिला कुलकर्णी यांनी सांगितले की, "वृक्षारोपण केले पाहिजे असे केवळ बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीत उतरविणे अधिक महत्त्वाचे आहे. आमची बॅच दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्याच भावनेतून आज २५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले."
पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. समाजातील प्रत्येकाने वृक्ष लागवडीसह त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या