भाईंदर, प्रतिनिधी : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे राष्ट्रीय, राज्यस्तरीय व शालेय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पदके मिळविणाऱ्या गुणवंत पैलवानांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास *मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर तथा मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष मा. श्री ध्रुवकिशोर पाटील* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच *मा. श्रीमती वर्षा भानुशाली, सभापती, प्रभाग समिती क्रमांक १, मीरा-भाईंदर महानगरपालिका*, यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. श्री ध्रुवकिशोर पाटील यांचा मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री मिलिंद लिमये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मा. श्रीमती वर्षा भानुशाली यांचा श्री गणेश आखाड्यातील महिला पालकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या अंडर-२३ सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणारे पैलवान विशाल जाधव, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ७९ किलो वजनी गटात रौप्यपदक विजेते पैलवान सुरज माने, सलग तीन वर्षे शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारे पैलवान ओम जाधव, तसेच मुंबई विद्यापीठ अजिंक्यपद विजेती, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी आणि अंडर-२० राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेती कु. कोमल पटेल यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी पैलवान विशाल जाधव व पैलवान ओम जाधव यांचे आई-वडील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. विशाल व ओम यांचे वडील माथाडी कामगार असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय व राज्यस्तरापर्यंत पोहोचविले आहे. त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या जिद्द व कष्टांना सलाम केला.
आपल्या मनोगतात मा. श्रीमती वर्षा भानुशाली यांनी श्री गणेश आखाड्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करत आखाड्याच्या विकासासाठी नेहमीच खंबीरपणे साथ देण्याचे आश्वासन दिले. मा. श्री ध्रुवकिशोर पाटील यांनीदेखील आखाड्याचा सर्वांगीण विकास, आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि कुस्ती खेळाच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
पैलवानांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्यक्त करत मा. श्री ध्रुवकिशोर पाटील यांनी श्री गणेश आखाड्याचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री वसंतराव पाटील व सौ.पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. तसेच आखाड्याचे ज्येष्ठ वस्ताद श्री रूपचंद माने, सौ.माने तसेच वस्ताद श्री नामदेवराव माटेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याचप्रसंगी पैलवान विशाल जाधव व पैलवान सुरज माने यांना वस्ताद श्री रूपचंद माने यांच्या वतीने रेसलिंग कॉस्च्युम मान्यवरांच्या हस्ते भेटस्वरूप प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री बलराज बागल यांनी अत्यंत प्रभावी व ओघवत्या शैलीत केले.
हा सत्कार समारंभ श्री गणेश आखाड्यातील खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा ठरला. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदक विजेत्या पैलवानांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या