प्रतिष्ठा न्यूज
संग्रामपूर | प्रतिनिधी : संग्रामपूर तालुक्यातील एकलारा फाटा येथे जमिनीच्या वादातून ज्येष्ठ पत्रकार भाऊराव (भाऊ) भोजने यांच्या मालकीच्या बंद हॉटेलची तोडफोड झाल्याची घटना शनिवारी (दि. 18 जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी तीन नामनिर्देशित आणि तीन अनोळखी अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलारा फाटा परिसरात असलेल्या भाऊराव भोजने यांच्या बंद अवस्थेतील हॉटेलवर काही जणांनी येऊन टिनपत्रे व लोखंडी अँगल काढून टाकत तीन टिनशेडची तोडफोड केली. या प्रकारात सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच भाऊराव भोजने घटनास्थळी पोहोचले असता, संबंधित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, याच जमिनीच्या वादातून यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित आरोपींनी हॉटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याने तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. त्यानंतरही वाद कायम राहिल्याने अखेर तोडफोडीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
भाऊराव भोजने यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी भीमराव लोखंडे, कुणाल लोखंडे, गजानन कोसे तसेच तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 329(3), 351(2), 352 आणि 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गाडे करीत असून, घटनेतील इतर आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.
या घटनेमुळे पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून संताप व्यक्त होत असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या