प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली येथील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी राजवीर हार्दिक देसाई याने रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत LEGO Line Following Competition (Beginner Category) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शानदार यशामुळे राजवीरची दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय Robotex स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे.
पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील स्पर्धकांमध्ये राजवीरने आपल्या कौशल्याची चमक दाखवली. त्याने लेगो लाईन फॉलोअर ट्रॅक अवघ्या २५ सेकंदांत पूर्ण करत स्पर्धेतील सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरले.
राजवीरच्या या यशामागे रोबोटिक्स, कोडिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याची प्रचंड आवड, सातत्यपूर्ण सराव, प्रयोगशील वृत्ती आणि कठोर परिश्रम यांचा मोलाचा वाटा आहे. विविध प्रयोग, आलेल्या अडचणी आणि त्यातून घेतलेल्या अनुभवांच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले.
या यशाबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील तसेच उपप्राचार्या सौ. विद्या आवटे यांनी राजवीरचे अभिनंदन करून दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जागतिक स्तरावरही तो भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजवीरच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सांगली जिल्ह्यासह पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पालक, शिक्षक आणि मित्रपरिवारातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तो भारताचा गौरव वाढवेल, अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या