प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव–कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि महसूल विभागाशी संबंधित कामांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी मंगळवार, दि. २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराला आमदार रोहित पाटील यांनी पुढाकार घेतला असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मातोश्री हॉल बोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथे हे शिबिर होणार आहे.या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागेवर निपटारा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सुविधा:
शेतकऱ्यांना बोजा प्रमाणपत्र वाटप.
राज्यपालांनी नामनिर्देशित सरपंच संबंधित कार्यवाही.
मुख्यमंत्री दलित वस्ती / गाव रस्ता योजना.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण.
राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना.
घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांची विशेष नोंद.
कौटुंबिक वाटपपत्रांवरील नोंदी.
विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण.
असंमत प्रकरणांवर जलद निर्णयासाठी कार्यवाही.
जमाबंदी दुरुस्ती व संबंधित महसुली कामे.
पीक नोंदी, वारस नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतील त्रुटी दूर करणे.
अनुकंपा नियुक्ती संदर्भात मार्गदर्शन.
ई-नोंदणी सेवा.
ई-फेरफार नोंदणी.
पीएम किसान योजनेशी संबंधित सेवा.
तक्रार निवारण.
याशिवाय इतर विभागही स्वतंत्र स्टॉल उभारून शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहेत.महसूल प्रशासनाने तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालय, तासगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या