सांगली प्रतिनिधी : सांगली-कोल्हापूर अतिवर्दळीच्या मार्गावरील वर्धमान प्लाझा इमारतीजवळील धोकादायक खुला नाला तातडीने बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी वर्धमान सोसायटीतील रहिवासी, परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांना निवेदन दिले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोहिते यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, शंभर फुटी रोडवरून येणारा गोभी नाला वर्धमान प्लाझा परिसरात खुला असून, पावसाळ्यात वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वर्धमान सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खुल्या नाल्यात यापूर्वी अनेक अपघात घडले असून जीवितहानीही झाली आहे. तसेच याच मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसची वाहतूक होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन संबंधित नाला बंदिस्त करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या