भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक प्रा. श्री. वसंतराव यशवंत पाटील यांची दैनिक लोक युवा यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६" साठी निवड झाली आहे.
गेली तीन दशकांहून अधिक काळ प्रा. वसंतराव पाटील यांनी कुस्ती, शिक्षण, सामाजिक व युवक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. मिरा-भाईंदरमध्ये श्री गणेश आखाड्याची स्थापना करून शेकडो राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. गरीब व होतकरू मल्लांना मोफत प्रशिक्षण, निवास, मार्गदर्शन व संस्कार देत त्यांनी कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ, निःस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी शेगाव येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. वसंतराव पाटील यांच्या या यशाबद्दल क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मिरा-भाईंदर परिसरात तसेच श्री गणेश आखाड्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या