प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 25,:- सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद वेगवान विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्या ग्राहकांना पीएनजी (पाईपड नॅचरल गॅस) चे कनेक्शन मिळाले आहे व गॅस पुरवठा सुरळीत आहे, अशा ग्राहकांचे घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन रद्द करण्याच्या व एलपीजीचा पुरवठा गरजू ग्राहकांना पुरवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या. या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके , सर्व ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पीएनजी कनेक्शन बंद झाल्याने घरगुती गॅस सिंलेडरचा अवैध वापर बंद होईल व तुटवडा निर्माण होणार नाही, असे मत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मांडले.
सिटी गॅस डीस्ट्रीब्युशनचे अधिकारी यांना जास्तीत जास्त कनेक्शन वाढविण्याच्या व महानगरपालिका प्रशासनासोबत सहकार्य करुन सामान्य जनतेस कमीत कमी त्रास होईल अशा पध्दतीने कार्य पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या भागामध्ये महानगरपालिकेकडून पीएनजी अधिकारी यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, त्या भागामध्ये लवकरात लवकर सर्व इच्छुक ग्राहकांना पीएनजी कनेक्शन मिळतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. मिरज एमआयडीसीप्रमाणेच कुपवाड एमआयडीसीतही लवकरात लवकर पाईपव्दारे नॅचरल गॅसचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या