डोंबिवली (पूर्व) – सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या डोंबिवली नगरीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती शिक्षण मंडळाच्या श्री. राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय तसेच बिहार म्हसकर पूर्व-प्राथमिक व प्राथमिक मराठी माध्यम शाळांच्या संकुलातील विद्यार्थ्यांनी ‘विठू-विठू’ पर्यावरण दिंडी मोठ्या उत्साहात काढली.
हरिनामाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. दिंडीपूर्वी शाळेच्या आवारात पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा संजय वैद्य, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा परेश देशपांडे तसेच पूर्व-प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी पोखरकर यांच्या शुभहस्ते हा पूजन सोहळा पार पडला.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली पारंपरिक प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत सामाजिक जाणीवही प्रभावीपणे व्यक्त केली. मंदिर परिसरात पारंपरिक रिंगण सादर करण्यात आले. सौ. पोखरकर बाई आणि सौ. देवलीला आटोळे यांनी अभंगगायन सादर केले, तर फुगडी, झिम्मा यांसारख्या पारंपरिक खेळांद्वारे विठ्ठलभक्तीचा उत्साह व्यक्त करण्यात आला. प्राथमिक व पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत विशेष आकर्षक दिसत होते.
संपूर्ण दिंडी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अत्तदे, श्री. देवरे, श्री. केदार तसेच सौ. जाधव, सौ. बिलाले आणि सौ. गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिसांच्या सहकार्याने शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भक्ती, परंपरा आणि पर्यावरण जागृतीचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या