प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली : मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि स्वा. सावरकर प्रतिष्ठान, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यात प्रथमच प्रयोगशाळा सहाय्यक व विज्ञान शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ९, १० व ११ जुलै २०२६ रोजी स्वा. सावरकर प्रतिष्ठान, गणपती मंदिराजवळ, मार्ग क्र. ३, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहे.
या कार्यशाळेत माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक आणि विज्ञान शिक्षकांना आधुनिक विज्ञान अध्यापन पद्धती, प्रयोगशाळेचे प्रभावी व्यवस्थापन, सुरक्षितता तसेच नवीन अभ्यासक्रमानुसार प्रयोगांचे नियोजन याविषयी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक व विज्ञान शिक्षकांना अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मराठी विज्ञान परिषदेचे सांगली जिल्हा समन्वयक सुनील देशपांडे आणि मुंबई विभागाचे प्रमुख राजेश समेळ यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईहून येणाऱ्या सहा तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी शिक्षकांना लाभणार आहे.
कार्यशाळेस LIC Pension Fund Ltd. (LIC PFL) यांचे आर्थिक सहाय्य लाभले असून, जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी प्रयोगशाळा सहाय्यक उत्तम मंगल (मो. ७५१७४८८९५४) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या