प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:हवामान आधारित पीक विमा योजनेतील पर्जन्य नोंदीतील तफावत दूर करण्यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.या दुरुस्तीमुळे येळावी,विसापूर आणि तासगाव मंडळातील शेतकऱ्यांना सुमारे १२ कोटी रुपयांचा अतिरिक्त पीक विमा मिळणार असून,एकूण मंजूर होणारी विमा रक्कम आता २७ कोटी ३३ लाख ४१ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या निर्णयाचा थेट लाभ १,५३७ शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी संजयकाका पाटील यांनी येळावी, विसापूर आणि तासगाव मंडळातील पर्जन्य नोंदीमध्ये हवामान खात्याच्या आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत गंभीर तफावत असल्याचा मुद्दा उचलून धरला होता.या विसंगतीमुळे हवामान आधारित पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.या तीन मंडळांतील सुमारे ७२० हेक्टर क्षेत्रावरील १,५३७ शेतकऱ्यांनी हवामान आधारित पीक विमा उतरविला होता.मात्र,चुकीच्या पर्जन्य नोंदीमुळे सुरुवातीला केवळ ११ कोटी ५८ लाख ९३ हजार ७६३ रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली होती.यावर आक्षेप घेत संजयकाका पाटील यांनी तातडीने संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू केला.यासंदर्भात त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून प्रश्नाचा पाठपुरावा केला.तसेच तासगाव शासकीय विश्रामगृहात स्कायमेट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजय मोरे, डिव्हिजनल मॅनेजर अरुण टिपूगडे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार,तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली.या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर कृषी विभाग आणि हवामान खात्याने येळावी मंडळातील पर्जन्य नोंदीतील तफावत दूर करून सुधारित पर्जन्यमान जाहीर केले. तसेच विसापूर मंडळातील तफावतही लवकरच दूर करून तेथील शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.सुधारित पर्जन्य नोंदीनुसार पूर्वी प्रति हेक्टर ५० हजार ८२५ रुपये मिळणारी भरपाई आता तब्बल ३ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी होणार आहे.त्यामुळे एकूण विमा रक्कम २७ कोटी ३३ लाख ४१ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढली असून,शेतकऱ्यांना सुमारे १२ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.या यशाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले आहे.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, बोरगावचे संदीप पाटील तसेच विसापूर येथील शेतकरी महेश डबे,आशिष पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोट :
"हवामान आधारित पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,हीच भूमिका घेऊन आम्ही हा पाठपुरावा केला.पर्जन्य नोंदीतील तफावत दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अजूनही ज्या मंडळांमध्ये तफावत शिल्लक आहे, तीही दूर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील."
— माजी खासदार संजयकाका पाटील
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या