प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगर परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत आर्थिक उत्पन्न वाढविणे, पाणीपुरवठा योजनेतील तूट कमी करणे,वीज खर्चावर नियंत्रण, स्वच्छता व्यवस्थापन,वृक्षलागवड, घनकचरा व्यवस्थापन तसेच विविध विकासकामे प्रभावीपणे राबविण्या बाबत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.बैठकीस नगराध्यक्षा सौ.विजयाताई पाटील, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे तसेच नगर परिषदेचे सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीवर विशेष चर्चा करण्यात आली. घरपट्टी,पाणीपट्टी,दुकान गाळ्यांचे भाडे तसेच इतर करांची प्रभावी वसुली करून नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.पाणीपुरवठा योजनेमुळे नगर परिषदेला दरवर्षी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत असल्याने या योजनेतील खर्चावर नियंत्रण ठेवत उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.नगर परिषदेचा वाढता वीज खर्च कमी करण्यासाठी ऊर्जा बचतीवर भर देत ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा विकसित करणे, वीज वापरावर नियंत्रण ठेवणे तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.राज्य शासनाच्या ३३० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत तासगाव शहरात मियावाकी पद्धतीने दाट वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
नगर परिषदेच्या अखत्यारीतील बालवाड्यांचे अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना आणि दिव्यांग कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
बैठकीत नगर परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच 'नमो उद्यान' प्रकल्पातील प्रस्तावित सुविधा आणि विविध स्पर्धात्मक घटकांचे योग्य नियोजन करून दर्जेदार अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी,शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय,जबाबदारी आणि लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून शासनाच्या विविध योजना व विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या