कडेगाव, दि. ६ : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, शेती, पर्यावरण आणि ग्रामीण जनजीवनावर परिणाम करणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून एकजुटीने आणि शांततामय मार्गाने संघर्ष करत आहेत. या संघर्षाचा पुढील टप्पा म्हणून मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मोर्चा व आंदोलन आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना होण्याची तयारीही पूर्ण झाली होती.
मात्र, मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांना प्रवासादरम्यान तसेच आंदोलनस्थळी गंभीर गैरसोयी व हाल सहन करावे लागू शकतात. शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत, तसेच कोणत्याही प्रकारचा जीविताचा धोका टाळण्यासाठी हा मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय संघर्ष मागे घेण्याचा नसून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक संघटित आणि प्रभावी स्वरूप देण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि शेती व जमिनीच्या संरक्षणासाठी हा रणसंग्राम यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानत, पुढील आंदोलनाची दिशा व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
– रणसंग्राम सोशल फाउंडेशन, कुंडल
अॅड. दीपक (दादा) लाड
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या