प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 28 : मेरा युवा भारत सांगली (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार) यांच्या वतीने नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज येथे होणार असून, सहभागासाठी 30 जुलै 2026 अखेर नोंदणी करावी. नोंदणीसाठी मेरा युवा भारत सांगली यांच्याशी 9970823930 व 997022047 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मेरा युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये लोकगीत (सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, रील स्पर्धा, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता), तसेच भाषण या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विषयावर आधारित असून व्यसनमुक्त निरोगी जीवनशैली - सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयावर स्पर्धकांनी आपली सादरीकरणे करावीत.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा जनजागृती उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या