प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा: तहसील कार्यालयात लागलेल्या भीषण आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी या घटनेने तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या अथांग निष्काळजीपणाची आणि सुरक्षेच्या वांझट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. केवळ शॉर्टसर्किटचे कारण सांगून प्रशासन आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असले, तरी या दुर्घटनेच्या निमित्ताने अनेक गंभीर आणि संतप्त प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शासकीय कार्यालये सुरक्षेशिवाय; सीसीटीव्ही गायब!तालुक्यातील एकाही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नाहीत, ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. आगीच्या वेळी नेमके काय घडले, घटना कशी घडली, याची कोणतीही फुटेज किंवा नोंद उपलब्ध नाही. सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात गैरहजर!स्थानिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने धावून जाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. परंतु, तालुक्यातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवासी राहतच नाहीत. दुर्घटनेच्या वेळी स्थानिक पातळीवर उत्तरदायी यंत्रणा वेळेवर उपलब्ध नसल्याने नुकसानीची तीव्रता वाढल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन पथक कागदावरच!आगीसारख्या किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी असणारे 'आपत्ती व्यवस्थापन पथक' ऐन दुर्घटनेच्या वेळी गायब असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कागदावरच अस्तिवात असलेल्या या पथकामुळे प्रशासकीय सुरक्षेचा फोलपणा उघडा पडला आहे.
अग्निसुरक्षा यंत्रणेचा बोजवारा आणि निष्पक्ष तपासाची गरजया कार्यालयात अग्निशामक यंत्रे, फायर अलार्म आणि सुरक्षेची नियमित तपासणी (फायर व इलेक्ट्रिक ऑडिट) झाली होती का? झाली असल्यास ती केवळ कागदावरच मर्यादित होती का? असा सवाल विचारला जात आहे. ही आग केवळ शॉर्टसर्किटमुळे लागली की त्यामागे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा अथवा अन्य काही कारण आहे, याचा निष्पक्ष तपास होणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
डिजिटल बॅकअपचा पत्ता नाही; कागदपत्रांचे अतोनात नुकसानआगीत महसूल आणि तहसील विभागातील महत्त्वाच्या नस्ती (फाइल्स) आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या महत्त्वाच्या शासकीय दस्तऐवजांचा डिजिटल बॅकअप उपलब्ध होता की नाही, याबद्दल प्रशासनाने अद्याप मौन बाळगले आहे. यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकांचे खरमरीत प्रश्न; दोषींवर कारवाई होणार का?जबाबदारी निश्चिती:
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाणार का?
भविष्यातील उपाययोजना:
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवणे हे अनिवार्य केले जाणार का?
शासकीय कार्यालयांमधील सुरक्षेचा हा 'रामभरोसे' कारभार थांबवून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करावे, अशी जोरदार मागणी आता गगनबावड्यातील जनतेकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या