प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 28 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक संकुल, सांगली येथे 26 जुलै रोजी सत्ताविसावा कारगिल विजय दिन उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सन 1999 च्या कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृतींना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालावडकर होते. कार्यक्रमास विंग कमांडर प्रकाश नवले (शौर्य चक्र) (निवृत्त), कर्नल कल्याणी (निवृत्त) आणि कॅप्टन सुनील गोडबोले (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कारगिल युद्धातील शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करून वीरमाता जनाबाई नामदेव पाटील तसेच वीरपत्नी फुलाबाई सुरेश चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शूरवीरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत आणि 'भारत माता की जय' च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या