पुणे, दि. २८ : राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत आमरण उपोषण आजही सुरू असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षण शिक्षक आणि TAIT-2025 पात्रताधारक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण विषय आहे. सक्षम समाज आणि बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविण्यासाठी या विषयाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. मात्र, गेल्या सुमारे वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर बेरोजगार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर महासंघाने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शांततामय आणि कायदेशीर मार्गाने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
- क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
- शासन निर्णय दि. २ जानेवारी २०२६ नुसार मंजूर ४,८६० क्रीडा शिक्षकांची सर्व (१०० टक्के) पदे पवित्र पोर्टल TAIT-2025 भरतीच्या पहिल्या टप्प्यात भरावीत.
- दि. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
- जिल्हा परिषद, केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व रिक्त क्रीडा शिक्षक पदे तातडीने भरावीत.
- पवित्र पोर्टल TAIT-2025 भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
महासंघाचे मार्गदर्शक प्रद्युम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोळे, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे, राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी तसेच सांगली जिल्हाध्यक्ष सोमनाथ बलगुडे, उपाध्यक्ष आसिफ मकानदार, सचिव प्रदीप इचलकरंजे यांनी राज्यभरातील पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या