प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याच्या व त्यांच्या पत्नीच्या छायाचित्रासह अधिकृत ई-मेलवर अश्लील आशयाचा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ यांच्यावर अखेर एसटी महामंडळाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक अमृत शेखर ताम्हणकर यांनी नदाफ यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून तातडीने निलंबित करण्याची मागणी केली होती.त्यानंतर विभागीय चौकशी आणि प्राथमिक अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याने श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तासगाव आगारातील कर्मचारी पवार आणि त्यांच्या पत्नीचा फोटो अधिकृत ई-मेलवर पाठवून त्याच्या विषय अश्लील भावना दर्शविणारा मजकूर लिहून तो महामंडळाच्या अधिकृत मेल आयडींवर प्रसारित करण्यात आला होता.हा ई-मेल संपूर्ण एसटीच्या अधिकृत मेल यंत्रणेत फिरल्याने संबंधित कुटुंबाची वैयक्तिक बदनामी झाली.यामुळे केवळ संबंधित कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागला नाही,तर एसटी महामंडळाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.या गंभीर प्रकाराची दखल घेत आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी सविस्तर अहवाल प्रभारी विभाग प्रमुख सुकन्या साठे यांच्याकडे सादर केला होता.अहवालात निसार नदाफ यांचे कृत्य हे त्यांच्या पदाला अशोभनीय असून शिस्त,सेवा आचरण आणि कार्यालयीन कार्यपद्धतीचा भंग करणारे असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते.दरम्यान,या प्रकरणी पवार (रा. वृंदावन कॉलनी, तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार निसार अहमद इब्राहिम नदाफ (रा. कवठेपिराण, ता. मिरज), सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, एसटी आगार तासगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. २० रोजी सायंकाळी ५.४९ वाजता संबंधित ई-मेल अधिकृत मेल आयडीवरून प्रसारित करण्यात आला होता.या घटनेनंतर एसटी कर्मचारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.आता गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याने या प्रकरणात एसटी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या