प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:छत्रपती श्री.शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा, जिद्द आणि शिवप्रेम याचा प्रेरणादायी प्रत्यय तासगावातील शिवभक्तांनी दिला आहे. १ जुलै रोजी समस्त तासगावकरांना रायगडावर पूजेचा मान असतानाच, शहरातील सहा शिवभक्तांनी अवघ्या १९ तासांत तासगाव ते रायगड हा खडतर सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून एक अभिमानास्पद पराक्रम केला.या मोहिमेत संदीप गणपतराव पाटील, सुरेश गणपत भोसले, विशाल विजय खेराडकर, अश्विनकुमार अरुण कोकणे, विजय पाटील आणि अर्जुन माने या सहा शिवभक्तांनी सहभाग घेतला होता.या सायकल मोहिमेची सुरुवात पहाटे ३.४५ वाजता तासगाव येथील शिवतीर्थावरून झाली.त्यानंतर विटा,पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, मेढा, महाबळेश्वर, पोलादपूर आणि महाड असा डोंगराळ व खडतर मार्ग पार करत हे शिवभक्त रात्री ११.३० वाजता रायगड किल्ल्यावर पोहोचले. तब्बल १९ तासांचा हा कठीण प्रवास त्यांनी जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट शारीरिक क्षमतेच्या जोरावर पूर्ण केला.रायगड हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणास्थान मानला जातो.अशा ऐतिहासिक गडावर सायकलने पोहोचून या शिवभक्तांनी महाराजांप्रती असलेली आपली निष्ठा आणि शिवप्रेम कृतीतून व्यक्त केले.विशेष म्हणजे,१ जुलै रोजी समस्त तासगावकरांना रायगडावर पूजेचा मान असल्याने या मोहिमेला अधिकच ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले.या पराक्रमाबद्दल तासगाव परिसरातून या सर्व शिवभक्तांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
जिद्द, चिकाटी, शिस्त आणि शिवभक्ती यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या सहाही शिवभक्तांचे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या