अक्षय कोठावळे / कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व मोहिमेअंतर्गत देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी व शिष्यवृत्ती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
मेळाव्यात समतादूत बार्टीचे मा. किरण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच जात दाखला व जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रथम संस्था, कोल्हापूरच्या सदस्या सौ. नशिबा समीर आनुरे यांनी कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी आणि करिअर नियोजन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर निपाणी लाईट हाऊस फाउंडेशनचे प्रमुख पुंडलिक कांबळे यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींसह समाजकल्याण विभागाच्या विविध योजना व सवलतींची माहिती दिली.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक बी. बी. वसावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह आणि खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. प्रज्ञा मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल घटेकरी यांनी केले.
यावेळी प्रा. नामदेव मधाळे, प्रा. नितीन कोले, शिवाजी कुंभार, प्रमोद अस्वले, शंकर खोत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शन मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात पडताळणी प्रक्रिया, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या