प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 21 : विकसित भारताच्या निर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करून राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मेरा युवा भारत, सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक निखील सावळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाबासाहेब उजगरे, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे नोडल अधिकारी गोरखनाथ किरदत, स्काऊट जिल्हा संघटक कैलास कापवार, रेड क्रॉस सोसायटीचे सचिव, एनसीसी 16 महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना निर्माण करण्यासाठी प्रभावी जनजागृती अभियानांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी दिल्या. तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम आयोजित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. एनएसएस, एनसीसी, भारत स्काऊट्स अँड गाईड्स आणि 'माय भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी व्यापक वार्षिक उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि युवक संघटनांमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून जास्तीत जास्त युवकांची ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते ‘माय भारत पोर्टल नोंदणी अभियान’ पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी मेरा युवा भारत, सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध युवा उपक्रमांचा सविस्तर आराखडा सादर केला. त्यांनी सांगितले की, १ जुलै २०२६ पासून ‘माय भारत’ पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या पोर्टलवर १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती नोंदणी करू शकतात. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन विकसित भारताच्या उभारणीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस मेरा युवा भारतचे सागर व्हनमाने, प्रशांत पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या