मिरज दि. २२ : स्व. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शिस्तप्रिय, धडाडीचे आणि विकासकामांवर लक्ष केंद्रीत करणारे होते. प्रशासनावरील मजबूत पकड आणि कामाचा प्रचंड वेग ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य वैशिष्ट्ये होती. ते महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते होते. कोणताही निर्णय वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय यंत्रणेला शिस्तीत काम लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. दिवसातील १६ ते १७ तास ते सातत्याने जनसामान्यांच्या कामासाठी आणि विकासासाठी उपलब्ध असत. आपल्या रोखठोक विधानांमुळे आणि प्रसंगी वापरलेल्या मार्मिक, नर्म विनोदी भाषेमुळे ते नेहमीच चर्चेत असत.कृषी, जलसंपदा आणि अर्थ यांसारख्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी राज्याच्या विकासाला आणि पायाभूत प्रकल्पांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले.सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असतानाही, त्यांनी नेहमीच ग्रामीण भाग, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चाललेल्या शैक्षणिक कामाबद्दल अजितदादा कायम कौतुक करायचे असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र मेथे यांनी केले. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित अजितदादा पवार जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
हा जयंती उत्सव संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील तसेच कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉ. सतीश पाटील यांच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमास संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या