प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : बलगवडे-तासगाव मार्गावरील पुणदी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. ९ जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात बलगवडे येथील नारायण गोविंद कोळी (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुकृपा नाष्टा सेंटरसमोर भरधाव वेगाने आलेल्या इर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले.
याबाबत केदार नारायण कोळी (वय २०, रा. बलगवडे) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नारायण कोळी हे आपल्या मुलांसह सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी डोंगरसोनी येथील काम पूर्ण करून ते पुणदी येथे दुसऱ्या कामासाठी जात असताना हा अपघात घडला.
फिर्यादीनुसार, केदार कोळी हे टेम्पोने पुढे गेले होते, तर त्यांचे वडील नारायण कोळी हे स्प्लेंडर मोटारसायकलवरून मागून येत होते. दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नारायण कोळी हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले.
प्रत्यक्षदर्शी विद्या विलास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस सुरू असताना पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार (एमएच-०३-बीएस-७४६७) भरधाव वेगाने येऊन प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटारसायकलींवर आदळली. त्यानंतर मोटारसायकल पार्क करत असलेल्या नारायण कोळी यांनाही कारची जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी नारायण कोळी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी सयाजी मारुती पाटील (रा. बलगवडे) यांच्याविरोधात निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, तासगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या दुर्दैवी अपघातामुळे बलगवडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कष्टकरी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या नारायण कोळी यांच्या निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या