विटा, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून विटा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही ड्रोन सर्वेक्षणाला जोरदार विरोध करण्यात आला. प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला.काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
विटाजवळील नागेवाडी, भाग्यनगर, माऊली, चिखलहोळ आदी गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोनद्वारे मोजणी आणि सर्वेक्षण करण्यासाठी पहाटेपासून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र स्थानिक शेतकरी आणि महिलांनी या कारवाईला तीव्र विरोध करत सर्वेक्षण रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी शेतकरी व पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही दिसून आले.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, महिला आणि नागरिकांनी विटा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी राजू शेट्टी यांनी प्रशासनाला धारेवर धरत, "पहाटे दोन वाजल्यापासून पोलिस तैनात करून सर्वेक्षण का केले जात आहे? शेतकरी दिवसभर कष्ट करून झोपलेला असताना कोणतीही स्पष्ट अधिसूचना न देता त्यांना त्रास देण्यामागचा उद्देश काय?" असा सवाल प्रांताधिकाऱ्यांना केला. प्रांताधिकारी विक्रमसिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
मोर्चादरम्यान अनेक महिलांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत "प्रसंगी जीव देऊ, पण जमीन देणार नाही," अशी भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असून अनेक कुटुंबे भूमिहीन होतील, अशी भीती व्यक्त केली. "आमचा विकासाला विरोध नाही; मात्र कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी सुपीक शेती उद्ध्वस्त केली जात आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा," अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ आणि पोस्टमधून राजू शेट्टी यांनी पोलिस प्रशासनावरही जोरदार टीका केली. "सांगली जिल्ह्यातील विटा-नागेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी रात्री दोन-तीन वाजल्यापासून पोलिस तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी कितीही दबाव आणला तरी शेतकरी हा प्रयत्न हाणून पाडतील," असा इशारा त्यांनी दिला.
तसेच त्यांनी सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावरही टीका करत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. "सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी आणि जी. डी. लाड यांच्या संघर्षाची परंपरा या मातीत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही," असेही शेट्टी यांनी म्हटले.
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्षामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या