प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरातील भिलवडी नाका ते विटा रोड या बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर यशस्वी ठरले असून प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. येत्या महिनाअखेरीस सर्व पात्र भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
भिलवडी नाका ते विटा रोड या बाह्य वळण रस्त्याच्या उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला तरी संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनकर्त्यांनी मंजूर झालेल्या निधीचे तात्काळ वितरण करावे, सातबारा उताऱ्यावरील भूसंपादनाचा शेरा हटवावा तसेच नुकसानभरपाईच्या रखडलेल्या रकमेवर व्याज द्यावे, अशा प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. आंदोलनाला परिसरातील शेतकरी व विविध सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळाला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या. यावेळी प्रशासनाने निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाअखेरीस सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात येईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली.
प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिलेल्या मुदतीत नुकसानभरपाई मिळाली नाही किंवा आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या यशामुळे भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महिनाअखेरीस कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या