कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने पहिले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा व्यापक विचार मांडण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले असून साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, कवी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक डॉ. कपिल राजहंस यांनी पत्रकार परिषदेत केले.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असतील. सुप्रसिद्ध शाहीर दिलीप सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार उपस्थित राहतील. कवी, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.
संमेलनात "अण्णाभाऊंच्या साहित्यातील जातिअंताचा विचार" या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आलोक जत्राटकर असतील तर डॉ. वैशाली चौगुले आणि राहुल सडोलीकर हे वक्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामधील सामाजिक समता, जातिअंत, परिवर्तनवादी विचार आणि समकालीन संदर्भ या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
चार सत्रात होणार्या संमेलनात डॉ. भारत पाटणकर, प्रा किसनराव कुराडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
भरत रसाळे, उत्तमदादा कांबळे, डॉ. शोभा चाळके, मदन पवार, डॉ. वसंत भागवत, अॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, विद्याधर कांबळे, सुरेश केसरकर, शाहीर दीपक गोठणेकर, डॉ. अमोल महापुरे, संजयकुमार अर्दाळकर, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. मिनल राजहंस, अंतिमा कोल्हापूरकर, निलेश बनसोडे, अमोल कांबळे, गंगाधर म्हमाने, शंकर पुजारी, सुनिल जाधव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी वारशाचा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांवर व्यापक चर्चा घडावी आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळ मिळावे या उद्देशाने हे पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने सांगण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. कपिल राजहंस, मदत पवार, डॉ. वसंत भागवत, अंतिमा कोल्हापूरकर, शंकर पुजारी, सुनिल जाधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या