पलूस, दि. २८ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रमांनी सुरू असलेल्या जनसेवा सप्ताहाची सांगता आज रक्तदान शिबिराने झाली. पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या शिबिरात ६७ व्या जयंतीनिमित्त १६७ कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन आदर्श ब्लड बँक, सांगली यांच्या सहकार्याने करण्यात आले. रक्तदानासाठी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याला कोणताही पर्याय नाही. अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, शस्त्रक्रिया तसेच विविध उपचारांसाठी रक्ताची सतत आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यामागचा उद्देशही समाजसेवेची भावना अधिक दृढ करणे हाच आहे."
जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम, शेतकरी मेळावे, युवकांसाठी संकल्प शिबिरे, विविध जनकल्याणकारी कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सप्ताहाची सांगता एका समाजहिताच्या संदेशाने झाली.
या प्रसंगी उल्हास पाटील, रणजीत शिंदे, राहुल पाटील, तोफिक मुल्ला, श्रीयोग पाटील, आशिष सूर्यवंशी, हरीश वडार, अनिल पाटील, अभिजीत कौलगे, तुषार सूर्यवंशी, विकी तातूगडे, अभिजीत कदम, अंकुश राजमाने, शुभम निकम, अनिल निकम (मोहिते वडगाव), कुलदीप वारे, मनोज चोगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरामध्ये सर्वप्रथम राहुल पाटील आणि अविनाश शिंदे यांनी रक्तदान करून उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सुरेश शिखरे, सुरज इनामदार, सुनील कुंभार, प्रशांत फाटक, परशुराम कट्टमणी, संतोष वडार, दादासाहेब वडार यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. समाजासाठी उपयुक्त अशा या उपक्रमामुळे जनसेवा सप्ताहाची सांगता प्रेरणादायी वातावरणात झाली. आयोजकांनी भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या