सांगली, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना साकार करणारा, रहस्य, थरार, ॲक्शन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बहुचर्चित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रचारानिमित्त सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत निर्माते डॉ. रसिक कदम यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील संकल्पना, कथानकाची वैशिष्ट्ये आणि भविष्यातील योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला चित्रपटातील प्रमुख कलाकार देवदत्त नागे, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील उपस्थित होते. कलाकारांनी आपल्या भूमिका, चित्रीकरणादरम्यानचे अनुभव आणि चित्रपटातील रोमांचक प्रसंगांविषयी माहिती दिली. यावेळी खासदार रामदास आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना निर्माते डॉ. रसिक कदम यांनी सांगितले की, ‘घबाडकुंड’ हा केवळ एक स्वतंत्र चित्रपट नसून मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची सुरुवात आहे. या चित्रपटातून उभे राहणारे कथाविश्व पुढील काळात अनेक नवीन कथा, पात्रे आणि रहस्यांनी विस्तारत जाणार आहे. त्यामुळे ‘घबाडकुंड’ हा केवळ एक मनोरंजनपट नसून एका मोठ्या प्रवासाचा प्रारंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाची कथा एका जुन्या आणि रहस्यमय विहिरीत लपवून ठेवलेल्या सोन्याभोवती फिरते. या ‘घबाडा’चा शोध घेण्यासाठी विविध स्वभावाची, वेगवेगळ्या हेतूंनी प्रेरित झालेली माणसे एकत्र येतात. सोन्याच्या शोधाची मोहीम जसजशी पुढे सरकते, तसतसे अनेक धक्कादायक रहस्यांचे पडदे उलगडत जातात. गूढ शक्ती, अनपेक्षित संकटे, फसवणूक, संघर्ष आणि रोमांचक घटनांमुळे कथानक अधिकाधिक उत्कंठावर्धक बनते.
चित्रपटातील ‘दिल्या’, ‘खुंगरी’, ‘रंगी’ आणि ‘बाबा’ यांसारखी वेगवेगळ्या ढंगाची पात्रे प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. प्रत्येक पात्राची स्वतंत्र पार्श्वभूमी, विचारसरणी आणि उद्दिष्टे असल्यामुळे कथानकाला अधिक खोली प्राप्त झाली आहे. रहस्य आणि थरारासोबतच विनोद, भावना आणि मानवी नातेसंबंध यांचाही प्रभावी संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘घबाडकुंड’ची आणखी एक विशेष बाब म्हणजे चित्रपटासाठी उभारण्यात आलेला भव्य सेट. पुण्याजवळ विशेषतः या चित्रपटासाठी विशाल सेटची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये प्राचीन गुहा, जुन्या विहिरी, ऐतिहासिक मंदिरांचे अवशेष, गुप्त बोगदे आणि रहस्यमय मार्ग उभारण्यात आले आहेत. या भव्य निर्मितीमुळे प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अद्भुत विश्वाचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
चित्रपटात संदीप पाठक, कुशल बद्रिके, देवदत्त नागे, गौरव मोरे, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता अंजुटे पायगुडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर आणि साहिल अनलदेवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम पाटील यांनी केले असून कथा-पटकथा संजय नवगिरे आणि अक्षय धर्मपाल यांनी लिहिली आहे. विष्णू घोरपडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली असून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फायटर मास्टर कार्तिक यांनी ॲक्शन दिग्दर्शन केले आहे.
पत्रकार परिषदेत कलाकारांनी सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत आजवर न पाहिलेला थरार, दर्जेदार ॲक्शन आणि रहस्यमय वातावरण ‘घबाडकुंड’मधून अनुभवायला मिळणार आहे. कथानकातील प्रत्येक वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवेल आणि शेवटपर्यंत उत्कंठा कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीवनात यश मिळवण्यासाठी संघर्ष, मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते; मात्र अचानक एखादे मोठे ‘घबाड’ मिळावे, अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. याच मानवी मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवत ‘घबाडकुंड’ची कथा आकाराला आली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून मानवी स्वभाव, लोभ, नाती आणि परिस्थिती यांचाही वेध घेणारा ठरणार आहे.
प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि संकल्पनेमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, १९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘घबाडकुंड’कडे मराठी चित्रपटसृष्टीसह चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या