गगनबावडा : स्थानिक पातळीवर अत्यंत उत्सुकता निर्माण करणाऱ्या 'ग्रुप ग्रामपंचायत सांगशी-सैतवडे'ची आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरले असून, गावात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. जाहीर झालेल्या सोडतीनुसार एकूण ३ प्रभागांमधील ९ सदस्यांच्या जागांचे वर्गीकरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यावेळच्या आरक्षणामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील राजकीय गणिते कमालीची गुंतागुंतीची आणि चुरशीची बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभागनिहाय आरक्षणाची स्थिती
प्रभाग क्र. १ (एकूण सदस्य संख्या: ३)
१. ओ.बी.सी. - स्त्री
२. सर्वसाधारण - स्त्री
३. सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ (एकूण सदस्य संख्या: ३)
१. ओ.बी.सी. - सर्वसाधारण
२. सर्वसाधारण - स्त्री
३. सर्वसाधारण - पुरुष
प्रभाग क्र. ३ (एकूण सदस्य संख्या: ३)
१. अनुसूचित जाती (SC) - स्त्री
२. सर्वसाधारण - स्त्री
३. सर्वसाधारण
प्रभाग ३ मध्ये होणार 'काटे की टक्कर'; जुनी आश्वासने पाळण्याचे नेत्यांपुढे आव्हान!
मागील निवडणुकीचा इतिहास आणि समीकरणे पाहता, यावेळच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वात मोठी चुरस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
मागच्या निवडणुकीच्या वेळी राजकीय तडजोडी करताना नेत्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना "यावेळी थांबा, पुढच्या वेळी तुमची वर्णी लावू" अशी आश्वासने दिली होती. आता ती वेळ आल्यामुळे संबंधित दावेदार नेत्यांकडे तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावून आहेत.
त्यामुळे मागील वेळी शब्द दिलेल्यांना या निवडणुकीत खुश करावेच लागणार आहे. जर जुन्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर नाराज गट बंडखोरी करण्याची किंवा छुप्या पद्धतीने दुसऱ्या पॅनेलला मदत करण्याची दाट शक्यता आहे. हाच पेच सध्या स्थानिक पुढाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, प्रभाग ३ मधील जागांचे वाटप करताना नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे.
महिलांचे वर्चस्व वाढणार!
या वेळच्या आरक्षण सोडतीमध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा आरक्षित झाल्याचे दिसून येत आहे. एकूण ९ पैकी तब्बल ५ जागांवर महिलांना थेट संधी मिळणार आहे. प्रभाग ३ चा विचार केला तर तिथेही ३ पैकी २ जागांवर (अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री) महिला उमेदवार रिंगणात असतील.
गावात मोर्चेबांधणीला वेग
आरक्षण जाहीर होताच कुठे आनंदाचे वातावरण आहे, तर कुठे दिग्गज नेत्यांचे पारंपारिक मतदारसंघ बदलल्यामुळे त्यांची गोची झाली आहे. प्रभाग ३ मधील पेच सोडवण्यासाठी आणि जुन्या नाराजांना चुचकारण्यासाठी आतापासूनच छुप्या बैठका, गाठीभेटी आणि मनधरणीच्या राजकारणाला वेग आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या