सांगली प्रतिनिधी : मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली आणि आयजीसी फोरम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. सांगली येथील रोटरी क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच सोलापूरचे फैज इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आयजीसी फोरमचे प्रा. डॉ. के. जी. पठाण यांनी आयजीसी फोरमच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी ट्रस्टतर्फे कोरोना काळातील मदतकार्य, महापूरग्रस्तांना सहाय्य, व्यसनमुक्ती अभियान, सीसीटीव्ही वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
या समारंभात सांगली जिल्ह्यातील निवडक ६१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची भूमिकाही संस्थांनी जाहीर केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून शिक्षणाच्या बळावर उच्च पदांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. समाजातील अशा संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचे संधीमध्ये रूपांतर करून यश संपादन करावे, असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि फैज इनामदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण आणि परिश्रमाच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान रंजनकुमार शर्मा आणि तुषार दोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने युवकांसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याबाबतची संकल्पना मांडण्यात आली.
कार्यक्रमापूर्वी पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या