प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हाभर भेसळयुक्त व बंदी असलेल्या पदार्थांविरोधात सुरू असलेल्या धाडसत्रामुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.याच पार्श्वभूमीवर तासगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाचे पथक येणार असल्याची चर्चा सुरू होताच शहरातील अनेक पानपट्ट्या व गुटखा विक्री केंद्रांनी अचानक शटर खाली ओढल्याचे चित्र पाहायला मिळाले.राज्यात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि तत्सम पदार्थांची विक्री तासगाव शहरासह परिसरात अनेक ठिकाणी सर्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत.अशा परिस्थितीत कारवाईच्या भीतीने दुकाने बंद ठेवण्यात आल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.विशेष म्हणजे, काही नागरिकांकडून "जर संबंधित विभागाला नियमित हप्ते दिले जात असतील,अशी चर्चा खरी असेल तर कारवाईची भीती नेमकी कशाची?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.या चर्चेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.शहरातील अनेक पानपट्ट्यांवर दिवसभर शुकशुकाट दिसून आला.नेहमी गजबजलेल्या ठिकाणी ग्राहकांना बंद दुकाने पाहून आश्चर्याचा धक्का बसला.काही व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली.दरम्यान,अन्न व औषध प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई झाली की केवळ धाडीच्या चर्चेमुळेच दुकाने बंद ठेवण्यात आली,याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.मात्र या घटनेने शहरात गुटखा विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.बंदी असलेल्या पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारच्या चर्चांमागील सत्यही समोर आणावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या