प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत लाखो रुपयांचा विमल पान मसाला,सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.अवैध गुटखा वाहतूक व विक्रीविरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी विशेष सूचना दिल्या होत्या.त्यानुसार तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
दि. ११ जून २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तासगाव-विटा मार्गावरील लिंब (ता. तासगाव) गावच्या हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा (एमएच १५ सीएम ५८३५) वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.कारवाईत 4 लाख 84 हजार रुपये किमतीचे विमल पान मसाला (केसरयुक्त) गुटखा जप्त करण्यात आला. या साठ्यात १० खाकी रंगाच्या बॅग, त्यामध्ये प्रत्येकी १० पांढऱ्या बॅगा आणि प्रत्येक बॅगेत १९८ रुपये किंमतीचे २२ पाऊच अशा एकूण २,२०० पाऊचचा साठा होता. या मालाचे एकूण वजन २१७.८ किलो इतके होते.याशिवाय ४८ हजार ४०० रुपये किमतीची V-1 सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. २० पांढऱ्या बॅगमध्ये ठेवलेल्या या मालात एकूण २,२०० पाऊच असून त्याचे वजन सुमारे ३३ किलो आहे.तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली. अशाप्रकारे एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला. कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणव नेताजी जिनगर आणि अनिल अरुण पवार यांनी वाहनाची तपासणी करून पंचनामा केला. त्यांच्या अहवालानंतर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.या प्रकरणी वाहन चालक गणेश आनंदा निकम (वय ३६), मूळ रा. पळशिवणे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सध्या रा. कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्कर आणि प्रतिबंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या