प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विष प्राशन करून आत्महत्या केली असून,गुडघ्याच्या होणाऱ्या जाचक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.त्यांचे गुडघ्याचे यापूर्वी देखील ऑपरेशन झाले असल्याचे समजते.या आठवड्यात देखील दुसऱ्यांदा ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता अशीही माहिती समोर येत आहे.या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली अशी चर्चा आहे.त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.याबाबत माहिती अशी कि,आळंदी येथील सुरज मराठे हे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते.कर्तव्यनिष्ठ,शांत आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती,अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.सुरज मराठे हे अविवाहित होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते रजेवर होते.आज सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन करून आयुष्याला पूर्णविराम दिला.ही बातमी समजताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.एका होतकरू अधिकाऱ्याचे असे अकाली जाणे, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे.घटनेचा पुढील तपास सुरू आहे:
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या